धक्कादायक ! जालन्यात बोटाचे ठसे वापरून वॉर्ड बॉयने बँक खात्यातून पैसे केले ‘गायब’

जालनाः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होत आहे. असे असताना जालन्यातील कोविड जिल्हा रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका वॉर्ड बॉयने चक्क मृत कोरोना रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरून फोन पे वरून त्यांच्या बँकेतील रक्कम आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. संबंधित वार्डबॉयने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.

मोमीन मोसीन असे अटक केलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कचरू पिंपराळे (रा. इंदिरानगर, जालना) असे संबधित मृत रुग्णाचे नाव आहे. पिंपराळे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अवघ्या काही तासांनी पिंपराळे यांच्या खात्यातून काही पैसे विथड्रॉल झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. बँक स्टेटमेंट आणि मोबाईल डिटेल तपासले असता पिंपराळे यांच्या मोबाईलमधून अंगठ्याचा ठसा वापरून फोनपे द्वारे 6 हजार 800 रुपये ट्रान्सफर केल्याचे आढळले. पिंपराळे यांचा मृत्यू तर पहाटे 6 वाजता झाला होता. मग दुपारी दीड ते 2 च्या सुमारास पैसे कसे ट्रान्सफर झाले, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला. दरम्यान मृत पिंपराळेंचा मोबाईल रुग्णालयातच असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. रुग्णालयातील वॉर्ड बॉय मोसीन याने पिंपराळे यांच्या अंगठ्याचा ठसा वापरून त्यांच्या खात्यातून फोनपेद्वारे 6800 रुपये ट्रान्सफर केल्याचे पुरावे कुटुंबीयांच्या हाती लागले. तसेच मृताजवळील 34 हजारांची रोकड आणि चांदीची अंगठीदेखील चोरीला गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.