अंबानींच्या घरासमोरील मोटार प्रकरण : दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉपिओ आणि त्याच्या चालकाला घेऊन गेलेल्या इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची एनआयएला ओळख पटली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चालकांचे धागेदोरे हे पोलीस मुख्यालयाशी जोडले आहेत. त्यामुळे एका मोठ्या पदावरील पोलीस अधिकार्‍याशी चौकशी केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवह स्कॉर्पिओ मोटारीच्या मागावर असलेली संशयित इनोव्हा कार एनआयएने जप्त केली. मुंबई पोलिसांच्या सीआययू पथकाची असून तिचा क्रमांक बदलून ती या कटात वापरण्यात आल्याचा संशय आहे. ८०० सीसीटीव्ही तपासणीत मोटारीचा डॅशबोर्ड, समोरच्या बाजूची विशिष्ट बनावट आदींच्या साह्याने या मोटारीचा शोध लावण्यात आला. त्यानंतर एनआयएचे पथक या संशयित मोटारीपर्यंत पोहचले. त्यांनी मोटार आणि त्याचे लॉगशीट ताब्यात घेतले आहे. त्यावरुन ही मोटार गुन्हा घडला, त्यावेळी कोठे होती, त्यावर कोण चालक होता, याची माहिती एनआयएला मिळाली आहे. त्यातून या गाड्यांवरील चालकांशी ओळख पटली आहे. या गाडीवरुन एनआयएला सचिन वाझे यांचा संशय आला. त्यावरुन त्यांनी वाझे यांना अटक केली आहे. आज सायंकाळपर्यंत त्यातील ठोस पुरावे एनआयएकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.