आता कांदा आणतोय शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

परांडा : पोलीसनामा ऑनलाईन – अस्मानी आणि सुलतानी संकटांनी पचलेल्या शेतकऱ्याला आता कांदा प्रश्न रडवतो आहे. दोन आठवड्या पूर्वी नाशिकच्या एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर राग व्यक्त करत कांद्याच्या विक्रीतून आलेली रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला पाठवून दिली त्यानंतर आज रस्त्यावर कांदे फेकून कांदा दराबद्दल आंदोलन करण्याचा प्रकार परांडा या ठिकाणी घडला असून हे आंदोलन स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

परांडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रस्त्यावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेद नोंदवला. शेतकऱ्यांनी आंबेडकर चौकात कांदा रस्त्यावर ओतून रस्ता रोखो केला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुष्काळी परिस्थिती मुळे कापूस,तूर,उडीद हि पिके वाया गेली. पाण्याची पातळी खोलवर गेलेली असतानाही कसे बसे कांद्याचे पीक शेतकऱ्यांनी जगवले परंतु ते हि पीक बाजार भावाने मारले म्हणून शेतकऱ्यांच्यामध्ये उदासीनता पसरली आहे. १०० ते ४०० रुपये  प्रति क्विंंटल  एवढ्या कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना आपला कांदा बाजारपेठेत मोठ्या नामुष्कीने विकावा लागत असल्याने सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मनात मोठा असंतोष खदखदत आहे. कांद्याला एवढा कमी भाव दिला जात असल्याने बाजारपेठेत कांदे घेऊन गेलेल्या वाहनाचे भाडे हि शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या पिकावर पाणी सोडणं शेतकऱ्यांनी पसंत केले आहे. काही शेतकऱ्यांनी तर कांद्याच्या शेतात नांगर घातले आहेत.

आंदोलनातील शेतकऱ्यांच्या  मागण्या 
– कांद्याच्या निर्यातीला चालना देऊन कांद्याला प्रति क्विंंटल २००० एवढा भाव देण्यात यावा
– दुष्काळाच्या सवलत सरकारने लागू करावी तसेच पाण्यावाचून करपून गेलेल्या पिकांचे पंचनामे करावे
– श्रावणबाळ, संजय गांधी योजनेअंतर्गत गरजू व वंचितांना प्रमाणपत्र त्वरित वाटण्यात यावी
– विधवा निराधार महिलांना अंतोदय शिदापत्रिकेचे वाटप करण्यात यावे.
या मागण्यासाठी  आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आले.