पुण्यात मिनी लॉकडाऊन ! खासदार गिरीश बापट म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यातील सर्व जनतेचे आज पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीकडे आणि लॉकडाऊन बाबतच्या घोषणेकडे लक्ष लागलेले होते. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. मात्र, पुण्यात लॉकडाऊन होणार नसून, लसीकरण वाढवण्यावर भर देणार असल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तूर्त तरी लॉकडाऊनचा धोका टळला असल्याचे संकेत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी भूमिका स्पष्ट केली. पीएमपीएल बस सेवा व हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्यास बापट यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच, संचारबंदी नाही तर दिवसभरात जमावबंदी असावी, असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. “आज पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस मी उपस्थित होतो, कोरोनाचं वाढतं संकट आणि रुग्णांची वाढणारी संख्या विचारात घेऊन उपाययोजना काय कराव्यात, यावर आज बैठकीत चर्चा झाली. काही गोष्टी ठरल्या, काही गोष्टींबाबक साशंकता आहे. मी किंवा आम्ही विरोधी पक्ष म्हणून कोरोनात राजकारण करू इच्छित नाही, करणार नाही आणि केलंही नाही. पण सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून आणि कोरोनाच्या सर्व उपाययोजना करत असताना, रुग्णसंख्या कमी व्हावी, रुग्णालयं, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, रुग्णवाहिका, कोविड, नॉनकोविड हे सगळं मिळावं म्हणून काही चांगल्या सूचना देखील आल्या व त्या मान्य देखील झाल्या.”

परिस्थिती हाताबाहेर जात आहे…

यावेळी खासदार बापट म्हणाले, दोन-तीन गोष्टींना आमचा विरोध आहे, पहिली गोष्ट म्हणजे पीएमपीएल बंद झाली नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की, पुण्यात राहणारा किंवा पुण्यात कामाला येणारा जो उद्योगधंद्यात काम करतो, तो जर येऊ नाही शकला तर हे सर्व उद्योग बंद पडतील. म्हणून कंपन्यांना विनंती करावी की, तुमचा वाहनसेवा सुरू करून त्याद्वारे कामगारांना घेऊन जावं किंवा कामगारांसाठी वेगळी पीएमपीएएलची व्यवस्था करा, ओळखपत्र तपासा. उगाच इकडं तिकडं फिरणाऱ्यांवर बंधनं आणली तर आमचं काही म्हणणं नाही. कारण परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पण जर रोजंदारीच बुडाली तर आम्ही तुम्हाला रेशन देखील देणार नाही. मानधनही देणार नाही, अशी अनेक घरं आहेत की दिवसभर काम नाही केलं तर संध्याकाळी चूल पेटत नाही. त्यांनी काय करावं? त्यांची आरोग्याची काळजी घेताना, त्यांच्या जीवनाची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणून पीएमपीएलच्याबाबतीत ५० टक्क्यांचा जो नियम होता तो ४० टक्क्यांवर करा, बाहेर जाणाऱ्या कामगारांना प्राधान्य द्या, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या. याबाबत पुढे काय निर्णय घ्यायचा आम्ही हे ठरवणार आहोत.

अनेकजणांची उपासमार

हॉटेल संदर्भात पार्सल सुविधा सुरू राहावी, अशी आमची मागणी होती जी चालू राहते आहे. असं दिसून येतं की हॉटेलमध्ये चहा- नाष्टा झाल्यानंतरही लोकं गप्पा मारत बसतात, अनेक वर्दळीच्या ठिकाणी माणसं उभं राहून नाष्टा करतात, त्यामुळे हॉटेल पूर्ण बंद न ठेवता, उभं राहून खाण्याची व्यवस्था ठेवावी. पार्सल सुविधा रात्री दहा वाजेपर्यंत ठेवावी. कारण बाहेरगावच्या अनेकजणांची उपासमार होऊ नये यासाठी हे महत्त्वाचे आहे. शहरातील हातगाड्यांवर पाचपेक्षा अधिक लोकं जमू नये.