खा. नवनीत राणांचं सनी देओल ‘स्टाइल’ वक्तव्य, महिलांच्या प्रश्नावर लोकसभेत मांडली आक्रमक ‘भूमिका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आता या अमानुष घटनेचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. खासदार नवनीत राणा यांनी आज संसदेत हा प्रश्न उपस्थित केला आणि अतिशय आक्रमक पद्धतीने नवनीत राणा यांनी महिलांच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा लावून धरला होता. राणा म्हणाल्या की महिलांवर होणारे अत्याचार अजून किती काळ सहन करायचे, या अत्याचाराविरुद्ध कडक कायदा झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महिलांच्या प्रश्नावर फक्त ‘तारीख पे तारीख’ असं सुरु असतं असं त्यांनी वक्तव्य करताच सगळ्यांना सनी देओल यांच्या चित्रपटातल्या डायलॉगची आठवण झाली. आणि विशेष म्हणजे सनी देओल देखिल सध्याला खासदार आहेत.

या प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनेत प्राध्यापिका जवळपास ४० टक्के भाजली आहे. सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये प्राध्यापिकेवर उपचार सुरू आहेत. सध्या प्रकृती गंभीर असून पुढील ४८तास हे फार महत्त्वाचे आहेत असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या घटनेत प्राध्यापिकेची श्वासनलिका भाजली आहे त्यामुळे श्वास घेण्यात अडथळा निर्माण झाला आहे तसेच डोळ्यालाही मोठी दुखापत झाली असून डावा हात आणि चेहरा मोठ्या प्रमाणात भाजला गेलाय. त्यामुळे प्राध्यापिकेची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांनी कृत्रिम पाईप टाकून तिचा श्वास सुरु ठेवला आहे परंतु धोका अजून तरी पूर्णपणे टळलेला नाही असे सांगण्यात आले आहे.

महिला प्राध्यापिकेवर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तसेच डॉक्टर म्हणाले की अशा अवस्थेत असणाऱ्या रुग्णास इन्फेक्शन फार लवकर होत असते त्यामुळे अतिशय काळजी घ्यावी लागते. काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडितेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च हा सरकार करेल असे सांगितले.