खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   तब्बल बारा वर्षांपासून अंथरुणाशी खिळून असूनही निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीची व्हीलचेअर दिल्याने न्हावरे (तालुका. शिरूर) येथील सर्वसामान्य कार्यकर्ता तब्बल बारा वर्षांनंतर चालू शकणार आहे.

न्हावरे (तालुका. शिरूर) येथे सुदर्शन जगदाळे हे गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठेने काम करत असून “एक कोटी अजित पवार व सुप्रिया सुळे”या लाखो फॉलोवर्स असलेल्या ग्रुप च्या माध्यमांतून काम करत आहे. त्यांना पक्षाने सोशल मीडिया चे राज्य सचिव म्हणून ही पद दिले आहे. या माध्यमातून त्यांनी लोकसभा,विधानसभा निवडणुकांमध्ये कामाचा करिश्मा दाखवत राज्यभरातील पदाधिकारी ही जोडले आहे.
सुदर्शन जगदाळे हे बारा वर्षांपूर्वी एका अचानक झालेल्या अपघाताने त्यांना मनक्याला इजा झाल्याने अंथरुणाशी खिळून होते. मात्र तरीही ते पक्षाचे काम निष्ठेने करत होते.त्यांच्या या कामाची दखल घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही त्यांचे कौतुक केले होते.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी सुदर्शन यांची ही परिस्थिती पाहून अत्याधुनिक Automatic Standing Wheelchair खरेदी करून नुकतीच भेट दिली आहे. याकामी त्यांचे स्विय सहायक यांनी मोलाची भूमिका बजावली.

याबाबत सुदर्शन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मला मिळालेली व्हीलचेअर ही वरदान असून या मुळे चालू शकणार आहे. तब्बल बारा वर्षानंतर माझे उभे राहण्याचे स्वप्न साकार झाले असल्याचे सांगत त्यांचे हे ऋण आयुष्यभर विसरणार नाही असे त्यांनी बोलताना सांगितले.