MPSC Exam Postponed : काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले – ‘अधिवेशन, लग्न समारंभ होतात; मग MPSC परीक्षा का नाही ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ठाकरे सरकारनं कोरोनाच्या (COVID-19) पार्श्वभूमीवर एमपीएससी (MPSC) परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला. यावरून आता काँग्रेस नेत्यानंच सरकारला घरचा आहेर दिला आहे. अधिवेशन, लग्न समारंभ, आरोग्य विभागाच्या भरती होतात, मग MPSC परीक्षा पुढं ढकलण्यात काय अर्थ आहे, असं वक्तव्य काँग्रेसे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे. इतकंच नाही तर एमपीएससी परीक्षांचा निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेण्यात आलं होतं की नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

‘लग्न समारंभ, अधिवेशन पार पडतात; एकट्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणं योग्य नाही’

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एमपीएससी परीक्षेबाबत अनिश्चितता योग्य नाही. कोरोना काळात लग्न समारंभ, अधिवेशन पार पडतात मग एकट्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणं योग्य नाही. विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा. ते भावी प्रशासकीय अधिकारी आहेत. कोरोना नियमांचं पालन करून परीक्षा घ्यायला हव्यात, असंही त्यांनी सांगितलं आहे.

एमपीएससी परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय आणि सरकारमध्ये मतभेद

14 मार्च रोजी एमपीएससी परीक्षा होणार होत्या. परंतु राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाकरे सरकारनं या परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता हजारो विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी पुण्यातील रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.

काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारनं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.