ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! रविवारी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एमपीएससीच्या पूर्व परीक्षेबाबत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने रविवारी (दि. 11 एप्रिल) होणार्‍या राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती. सध्या ती स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भातील बैठकीत हा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी होत होती. त्याच पार्श्वभुमीवर ठाकरे सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातून या परीक्षेसाठी 42700 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. राज्यातील 109 उपकेंद्रांवर ही परीक्षा रविवारी होणार होती. यासंदर्भातील सर्व तयारी देखील प्रशासनाकडून झाली होती. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी जोरदार मागणी होत होती. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन देखील केला होता.