IPL पूर्वी धोनी बनला ‘शेतकरी’ ! खरबूज-पपई उगवण्याची शिकतोय पद्धत (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्रसिंग धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. धोनी आयपीएल २०२० मध्ये धूम करण्यासाठी सज्ज आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी २ मार्च रोजी संघात सामील होईल. पण या आधीच धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

फेसबुक अकाउंटला शेअर केलेल्या या व्हिडिओत धोनी एक वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. धोनी सध्या शेती करण्याचा विचार करताना दिसत आहे, एवढेच नाही तर धोनीने यावर अंमलबजावणी देखील सुरु केली आहे.

३८ वर्षीय धोनीने आता सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली आहे. आजकाल धोनी आपल्या गावी रांचीमध्ये खरबूज आणि पपईच्या सेंद्रिय शेतीची पद्धत शिकत आहे. असे म्हटले जात आहे की धोनीने आता आपल्या निवृत्तीच्या योजनेवर काम सुरू केले आहे.

महेंद्र सिंग धोनीने आपल्या अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, ‘रांचीमध्ये २० दिवसात खरबूज आणि पपईची लागवड करून सेंद्रिय शेतीची सुरुवात केली आहे, याबाबत मी खूप उत्सुक आहे.’

दोन मिनिटाच्या या व्हिडिओत धोनी शेती सुरु करण्याच्या आधी पूजा अर्चा करताना दिसला. या दरम्यान धोनी धूप लावताना आणि नारळ फोडताना देखील दिसला.

दुसरीकडे क्रिकेटपासून दूर असलेल्या माहीने आयपीएलची तयारी देखील सुरू केली आहे. मंगळवारी धोनीने रांचीच्या झारखंड क्रिकेट असोसिएशन (जेएससीए) स्टेडियमवर जाऊन सराव केला होता.

आयपीएल २०२० ची सुरुवात २९ मार्च रोजी मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यापासून होणार आहे.