MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनीनं अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आत्ताच का घेतला संन्यास ? ‘हे’ आहे मोठे कारण

नवी दिल्ली : भारताला क्रिकेट जगतात एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने क्रिकेटला अलविदा केले आहे. धोनीने कर्णधार म्हणून भारताला 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पीयन्स ट्रॉफी मिळवून दिली. भारताने महेंद्र सिंह धोनीच्या कर्णधार पदाच्या काळात जेवढे यश मिळवले, तेवढा क्वचितच अन्य भारतीय कर्णधाराकडे इतका मोठा रेकॉड असू शकेल. धोनीच्या रिटायर्डमेंटच्या घोषणेने एकीकडे त्याच्या चाहत्यांना नाराज केले आहे, तर दुसरीकडे प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे की, अखेर अशावेळी धोनीने निवृत्ती घेण्याची घोषणा का केली.?

महेंद्र सिंह धोनीला भारताला आणखी एक मोठा विजय मिळवून दिल्यानंतर निवृत्त व्हायचे होते. यासाठी तो टी-20 वर्ल्ड कपची प्रतीक्षा करत होता, परंतु कोरोना व्हायरसने त्याच्या प्लॅनिंगवर पाणी फिरवले. टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्यात आला आणि धोनीला ज्याप्रकारे निवृत्ती घ्यायची होती तशी घेता आली नाही.

महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेवर टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे की, धोनी मोठ्या कालावधीपासून आयपीएल टी-20 टूर्नामेंटची वाट पहात होता. कोरोना आला नसता तर कदाचित आयपीएल मार्च-एप्रिलमध्ये झाली असती. आयपीएलमध्ये त्याचा परफॉर्मन्स त्याच्यासाठी टी-20 वर्ल्ड कपचे दरवाजे उघडू शकला असता. धोनीची इच्छा होती की, भारताला पुढील टी-20 वर्ल्ड कप मिळवून दिल्यानंतर निवृत्तीची घोषणा करायची. परंतु, अनेकदा काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. कोरोना व्हायरसने सर्वकाही बरबाद केले आहे.

गावस्करने म्हटले की, कोरोना महामारीमुळे ज्याप्रकारची स्थिती आहे, ती पाहता वाटते की, टी-20 वर्ल्ड कप आता पुढील वर्षी होऊ शकतो. धोनीला माहित होते की तोपर्यंत खुप उशीरा झाला असता. धोनीला ज्याप्रकारे निवृत्ती घ्यायची होती, ते शक्य असल्याचे दिसत नव्हते. याच कारणामुळे त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली.