खळबळजनक ! रिक्षा चालकानं पाजलं भरमसाठ मद्य अन् लुटलं 4 लाखाला, अति मद्यपानामुळं मुंबईच्या व्यापार्‍याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईवरून पुण्यात 4 लाखांची रोकड घेऊन आलेल्या एकाला रिक्षा चालकाने इच्छित स्थळी न नेता बर्निंगघाट भागात नेहून त्याठिकाणी पुन्हा दारू पाजून त्याच्याजवळील पैसे घेऊन थंडीत झाडात सोडून गेले. पण, थंडीच्या कडाक्यात अन दारूच्या अतिसेवनामुळे त्याचा कुडकुडूत दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बर्निंगघाट परिसरात ही घटना घडली आहे.

राजेश लिलाधर म्हात्रे (वय 46, रा. बेलापुर, नवी मुंबई) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शादाफ जहांगिर बांगी (वय 28, रा. शेलार चाळ) अटक केली आहे. याबाबत उपनिरीक्षक चित्रा चौधरी यांनी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात सरकारतर्फे  फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश म्हात्रे हे व्यापारी आहेत. तर, आरोपी शादाफ हा रिक्षा चालक आहे.

दरम्यान, 28 नोव्हेंबर रोजी कोरेगांव पार्क पोलीसांना बर्निंगघाट परिसरात एका व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, कर्तव्यावर हजर असणार्‍या महिला उपनिरीक्षक चित्रा चौधरी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पाहणी करून तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यानुसार, याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू होता.

पोलिसांनी माहिती गोळी केली असता मयत व्यक्तीचे नाव राजेश म्हात्रे असून, ते मुंबईतील बेलापूर येथील व्यापारी असल्याचे समजले. त्यानुसार माहिती काढण्यात आली. त्यावेळी ते 26 नोव्हेंबर 2019 रोजी ते मुंबईवरून पुण्यात बसने आले होते. स्वारगेट परिसरात बसमधून उतरल्यानंतर त्यांनी रिक्षा पकडली. बांगी याने त्यांना प्रवाशी म्हणून रिक्षात घेतले. तत्पुर्वी म्हात्रे यांनी मद्यपान केले होते. त्यामुळे त्यांना शुद्ध नव्हती. त्यांनी बुधवार पेठ येथे जाण्याचा पत्ता सांगितला. मात्र, आरोपी बांगी याने त्यांना रिक्षात घेतल्यानंतर पाहिले असता त्यांच्या खिसात पैशांचे बंडल दिसले. त्यानंतर त्याने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून घेतले.

त्यानंतर तिघेजण त्यांना घेऊन कोरेगांव पार्क परिसरातील बर्निंगघाट रोडवरील लिंगायत स्मशान भुमीत नेले. तेथे तिघांनी त्यांना पुन्हा दारू पाजली. त्यानंतर ते बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्या खिशातील तब्बल 4 लाखांची रोकड काढून घेतली. तसेच, त्यांना झाडांमध्ये टाकून बांगी व त्याचे साथीदार पसार झाले. मद्याच्या अतिसेवनामुळे तसेच झाडात टाकल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांनी हा प्रकार समोर आल्यानंतर या घटनेचा उलघडा झाला आहे. अधिक तपास कोरेगांव पार्क पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/