संशय कल्‍लोळ ! पोलीस वसाहतीत आग की आणखी काय ; 15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादरच्या पश्‍चिमेला असलेल्या पोलीस वसाहतीत आज (रविवार) एक भयंकर घटना घडली. वसाहतीमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागली. आगीत होरपळून 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पोलीस वसाहतीत आग लागून 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुलीचा मृत्यू आग लागल्यामुळे झाला की अन्य काही कारण आहे याचा तपास पोलिस करीत आहेत. मुलीने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

श्रावणी अशोक चव्हाण (15) असे आगीत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास अचानकपणे पोलीस वसाहतीतील पाच क्रमांकाच्या इमारतीतील तिसर्‍या मजल्यावर आग लागली. आग लागल्याचे समजताच अग्‍नीशमन दलाचे जवळपास 8 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच आग नियंत्रणामध्ये आणली. तोपर्यंत 3 घरांचे मोठे नुकसान झाले होते. श्रावणीचे आई-वडिल एका लग्‍न समारंभासाठी बाहेर गेले होते. ते बाहेर जाताला घराला कुलूप लावून गेले होते. श्रावणी घरात एकटीच होती. आग लागल्यानंतर ती आगीत होरपळून मृत्यूमुखी पडली. त्यामुळे ही केवळ दुर्धटना होती की श्रावणीने आत्महत्या केली अशी चर्चा होत आहे. श्रावणीच्या मृत्यूबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे संशयाचा धूर निघत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.