परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, यूएलसी घोटाळ्याच्या तपासात पैसे उकळल्याचा आरोप, ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप करून चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2017 मध्ये सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी यूएलसी घोटाळ्यातील आरोपी बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याच्या आरोपप्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश राज्य सरकारने ठाणे पोलिसांना दिले आहेत. दरम्यान सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची ही 5 वी तक्रार आहे. आता यूएलसी घोटाळ्याच्या चौकशीत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तपास सुरू झाल्याने सिंग यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

यूएलसी घोटाळ्याच्या तपासात परमबीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप मीरा-भाईंदर येथील बिल्डर राजू शहा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सूरू केला आहे. यूएलसी घोटाळ्याची चौकशी करताना माझ्या आदेशाशिवाय कोणाचीही चौकशी अथवा गुन्हे दाखल करू नका, असे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाणे पोलिसांना स्पष्टपणे बजावले होते.

त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास करण्यासाठी गृह विभागाने ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत 2017 मध्येच एफआयआर दाखल झाला असून त्यानुसार ठाणे पोलीसांनी तपास सुरु केल्याचे गृह विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले आहे. यूएलसी घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित विविध अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदविले आहेत. दरम्यान अकोला येथील पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास गृह विभागाने सीआयडीकडे हस्तांतरित केला आहे.