मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र ATS ने दाखल केलाहत्येचा गुन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या गृहविभागाच्या आदेशानुसार संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. गेल्या शुक्रवारी मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर मुंब्रा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती.

एटीएसने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलिसांकडून हस्तगत केली असून पुढील तपास सुरु केला आहे. त्यानुसार आज भा.द.वि. कलम 302,201,34,120-B प्रमाणे हिरेन यांच्या पत्नी विमल मनसुख हिरेन यांच्या फिर्यादीवरुन एटीएसने गुन्हा दाखल केला. शवविच्छेदन अहवाल ठाणे पोलिसांना मिळाला आहे. हिरेन यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून मृतदेह 10 तास पाण्यात होता अशी शक्यता अहवालातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, आज एटीएसच्या पथकाने हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन चौकशी केली. यावेळी कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला.

शवविच्छेदन अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर छोट्या जखमा होत्या. तसेच त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी जखमा असल्याचे बोललं जात आहे. जर हिरेन यांनी आत्महत्या केली असती तर एकाच बाजूला जखम होणे अपेक्षित होते. मात्र दोन्ही बाजूला झालेल्या जखमांमुळे या प्रकरणाचे गूढ वाढलं आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख हिरेन यांचं शवविच्छेदन करण्यात आले. हिरेन यांचा व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे.