लोका सांगे ब्रम्हज्ञान ! मुंबईचे वादग्रस्त महापौर पुन्हा चर्चेत, मोडला ‘हा’ नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुसळधार पावसात मुंबईतील रस्ते, ओढे बुडाले असताना शहरात कोठेही पाणी साठले नसून वाहतूक सुरळीत सुरु असल्याचा दावा केल्याने वादात अडकलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. आता त्यांची गाडी विलेपार्ले येथे एका हॉटेलबाहेर असलेल्या नो पार्किंग झोनमध्ये आढळून आली.

मुंबई पावसात बुडालेली न दिसणाऱ्या महापौरांना आता नो पार्किंगचा बोर्डही दिसत नाही का अशी जोरदार टिका सुरु झाली. लोकांच्या टिकेची दखल घेऊन अखेर महापौरांना दंड आकारत ई चलन पाठविले आहे.

मुंबई महानगर पालिकेने रस्त्यावर वाहनांच्या अनधिकृत पार्किंगविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आठ दिवसात २५ लाख रुपये बेकायदा पार्किंगमधून वसुल करण्यात आले आहे. आतापर्यंत ५०५ जणांना भरमसाठ दंड ठोठावण्यात आला आहे.

हा पार्किंगचा नियम वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी करण्यात आला आहे. मात्र, या नियमांना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच हरताळ फसला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी विलेपार्ले येथे नो पार्किंग क्षेत्रात उभी करण्यात आल्याची छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली आणि महापौर व शिवसेना अडचणीत आली.

मात्र महापालिकेने महापौरांच्या गाडीवर कोणतीही कारवाई केली नव्हती. टीका होऊन लागल्याने शेवटी महापौरांनी जर मी नियम मोडला असेल तर मला नोटीस पाठविण्यात यावी, मी दंड भरेन असे म्हटले. त्यानंतर आता महापालिकेने ई चलन पाठविले आहे.