मंत्रालयाचा मोठा निर्णय ! आता 2 शिफ्टऐवजी एक दिवसाआड काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. राज्याचा कारभार जिकडून चालतो त्या मंत्रालयात कामाच्या शिफ्टमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मंत्रालयात दोन शिफ्टऐवजी एक दिवसाआड काम करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मंत्रालयात दोन शिफ्टऐवजी एक दिवसाआड काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल सर्व विभागांना सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. तसेच मंत्रालयातील प्रत्येक विभागाच्या सचिवांनी कर्मचारी विभागणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

या अगोदर दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे नियोजन करण्यात आले होते, पण कामात अडचणी येत असल्यामुळे एकदिवसआड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयामधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी मुख्य सचिव यांनी सर्व सचिवांना सूचना दिल्या होत्या. या सूचनांमध्ये आठवडा, प्रत्येकी १ दिवसाआड किंवा ३ दिवस अदलाबदली कर्मचारी काम करण्याबाबत नियोजन करावे, असे सांगण्यात आले होते.

मुख्य सचिवांनी मंत्रालयातील प्रत्येक विभागात सामाजिक सुरक्षा अंतर, कर्मचारी गर्दी होणार नाही, सॅनिटायझर वापर याकडे सचिवांनी लक्ष द्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता कामात अडचणी येत असल्यामुळे एकदिवसाआड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.