पोलीस आयुक्त हेमंत नगराळे घेणार मोठा निर्णय, मुंबई पोलिस दलात होणार फेरबदल ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन वाझे प्रकरणात पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी नवीन आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. नगराळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी पारखून त्यांच्यावर जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते. या फेरबदलात गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांसह IPS अधिकाऱ्यांच्याही बदल्या होण्याची शक्यता असून आजच बदल्यांची ऑर्डर निघणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.

अंबानी स्फोटक प्रकरणात परमबीर सिंह यांची देखील चौकशी होण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलिस आयुक्त पदावर असताना चौकशी होणे म्हणजे सरकारची बदनामी होण्यासारखी आहे. तसेच वाझे यांना सातत्याने पाठीशी घालणे यामुळे अडचणीत आलेल्या सरकारने अखेर सिंह याची उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली आहे. तर रजनीश सेठ यांच्याकडे राज्य पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे.