मुंबई पोलीस झळकले सातासमुद्रापार, परदेशी नागरिकाचा लाखोचा ऐवज दिला शोधून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कामानिमित्त भारतात आलेल्या एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा लाखो रुपयांचा गहाळ झालेला ऐवज मुंबई पोलिसांनी शोधून दिला. वनराई आणि कुलाबा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कामगिरीमुळे मुंबई पोलिसांचे नाव सातासमुद्रापार गाजले आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकाचा गहाळ झालेला लाखो रुपयांचा ऐवज काही तासात पोलिसांनी शोधून दिला.

मुळचे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले अ‍ॅडम जॅक्सन  हे आर्किटेक्ट असून ते अबूधाबी येथे राहतात. मागील आठवड्यात काही कामानिमित्त ते भारतात आले होते. गेटवे ऑफ इंडिया येथून ते हॉटेल फ्रेनमध्ये गेले. मात्र, हॉटेलमध्ये आल्यानंतर गडबडीत त्यांची लॅपटॉपची बॅग टॅक्सीमध्ये विसरली. ही बाब त्यांच्या लक्षात येईपर्य़ंत टॅक्सी चालक तेथून निघून गेला होता. त्यानी तात्काळ वनराई पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला.

रात्रपाळीवर असलेल्या पोलीस निरीक्षक खरात आणि पोलीस उपनिरीक्षक शिरवाडकर यांनी त्यांचे ऐकून घेत धीर दिला. तपासी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक  भारत घोणे यांना घटनेबाबत सांगितले. घोणे यांनी फ्रेन हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही तपासले असता अ‍ॅडम ज्या टॅक्सीतून उतरले त्या टॅक्सीचा नंबर घेतला. मिळालेल्या नंबरवरून टॅक्सी मालकाचा शोध घेतला असता ही टॅक्सी शिवशंकर कांबळे यांची असल्याचे समोर आले. वनराई पोलीस कांबळे रहात असलेल्या ट्र टर्मिनस येथे गेले मात्र, त्यांना कांबळे भेटले नाहीत.

दरम्यान, घोणे यांनी कुलाबा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत गावडे यांना घडलेली घटना सांगितील. गावडे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने टॅक्सीचा शोध घेतला. तसेच टॅक्सीत विसरलेली काळ्या रंगाची बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली. त्या बॅगेत 1500 अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनाप्रमाणे 10 लाख 65 हजार), निकॉन डी 810 कॅमेरा, दोन लेन्स, रोस कंपनीचे घड्याळ असा लाखो रुपयांचा ऐवज त्या बॅगेत होता. गहाळ झालेली बॅग मुंबई पोलिसांनी काही तासात शोधून ती परत केल्यामुळे अ‍ॅडम यांनी मुंबई पोलिसांचे अभार मानले.

Visit : Policenama.com