काय सांगता ! होय, मुंबईमधील प्रसिध्द दहीहंडी मंडळाचा प्रशिक्षक तडीपार, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकीय दबावाखाली पोलीस यंत्रणेचा वापर करुन एक वर्षासाठी तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप, राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर दहीहंडी उत्सवाला ख्याती मिळवून देणारा प्रशिक्षक संदीप ढवळे याने केला आहे. तसेच मला एका प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले असल्याचेही त्याने समाज माध्यमात एक पोस्ट करुन सांगितले आहे.

या पोस्ट मध्ये संदीप म्हणतो, एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला इतर एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी मारहाण करताना त्याला वाचवण्यासाठी गेलो. तेव्हा समोरील गटाकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना काही जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला. त्यामध्ये बरेच दिवस तुरुंगात घालवले. जामिनावर सुटका झाल्यानंतर राजकीय दबावाखाली पोलीस यंत्रणेला हाताशी धरुन तडीपारची नोटीस काढण्यात आली.

कारवाई अन्यायकारक
पुढे त्याने म्हटले की, समाजात दहशत निर्माण करुन, दुकानदारांना खंडणी मागत असल्याचे खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले. या प्रकरणाने माझं कुटूंब दबावाखाली असून, माझ्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा त्याने केली आहे. चूक नसताना ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अन्यायकारक असून, मराठी तरुण असेच तडीपार व्हावेत आणि देशोधडीला लागावेत, अशी व्यथाही त्याने मांडली.

कोण आहे संदीप ढवळे ?
मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील जय जवान गोविंद पथकाचा संदीप ढवळे प्रशिक्षक आहे. मुंबई, सातारा-सांगलीतील महापूर, कोकणातील चक्रीवादळ आणि कोरोना संकटादरम्यान अनेक गरजुंना जीवाची पर्वा न करता मी व माझ्या पथकातील खेळाडूंनी मदत केली. पण एका प्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आले. सराईत गुंडासारखी वागणूक देण्यात येत आहे, असेही ढवळेने सांगितलं.