शिवसेनेची ‘हवा’ प्रदुषित नाही ; राजकीय वर्तुळातील ‘त्या’ चर्चेवर आदित्य ठाकरेंचं ‘स्पष्टीकरण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजप दुसऱ्यांदा सत्तेत आली. आता खाते वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. त्यात शिवसेनेला पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालय दिलं आहे. यावरून शिवसेनेत नाराजी व्यक्त होत आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. तसंच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ही नाराजी नवर्निवाचीत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कळवल्याचेही समोर आले होते. मात्र युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी यावर साफ नकार दिला आहे. शिवसेनेची हवा प्रदुषित नाही, असं त्यांनी सांगितलं. ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रातलं अवजड उद्योग मंत्रालय पुन्हा एकदा शिवसेनेच्या हाती आल्याने शिवसेनेत नाराजी असल्याचे समोर आले होते. मात्र आदित्य ठाकरेंनी याला नकार दिला आहे, तसंच शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही, असं म्हटलं आहे. शिवसेनेची हवा प्रदुषित नाही. ज्यांनी कोणी ही बातमी पसरवली आहे, हे त्यांच्या मनातील विचार असतील. प्रत्यक्षात असं काही नाहीए. शिवसेनेत कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वीही अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार शिवसेनेकडेच देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हेच मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला आलं आहे. त्यामुळे खात बदलून मागितल्याचा दावा होत होता. शिवसेनेच्या वरिष्ठांनी अमित शहांकडे तशी मागणी केल्याचेही म्हटलं जात होते. मात्र अमित शहांनी यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नाहीय.