मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकलची सेवा सुरु

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्माचार्‍यांसाठी मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा बंद होती. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेर्‍या करणार आहे.

सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना मात्र या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ही उपनगरीय सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठीच असणार आहे. शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍याचे ओळखपत्र पाहूनच त्यांना या ट्रेनमधून प्रवासाचे तिकीट मिळणार आहे.

मुंबईत जीवनावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सेवा सुरु केली जावी यासाठी राज्य सरकार अनेक दिवसांपासून आग्रही होते. यासंदर्भात काल एक महत्वाची बैठक रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकार यांच्यात झाली. त्यानंतर लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून सुरु झालेल्या या उपनगरीय सेवेच्या फेर्‍यात कोणाकोणाला प्रवास करता येईल, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारलाच असणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-डहाणू रोडवर उपनगरीय सेवा सुरु झाली आहे. या मार्गावर अप 73 आणि डाऊन 73 अशा, 12 डब्यांच्या 146 फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. दर 15 मिनिटांच्या अंतराने धावणार्‍या या बहुतांश उपनगरीय फेर्‍या विरार आणि बोरिवलीपर्यंत असतील तर उर्वरित डहाणू रोडपर्यंत जातील.

पहाटे 5.30 पासून रात्री 11.30 पर्यंत लोकल धावतील. रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 65 ट्रेन चर्चगेट ते विरार आणि 8 ट्रेन विरार ते डहाणू रोड मार्गावर धावतील. या ट्रेन चर्चगेट ते बोरिवली मार्गावर फास्ट असतील तर त्यापुढे स्लो होतील. सेंट्रल रेल्वे अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी 100 अशा 200 ट्रेन चालवणार आहे. सेंट्रल रेल्वेवरील ट्रेनही वेस्टर्नप्रमाणेच फास्ट ट्रेनच्याच थांब्यांवर थांबतील. या ट्रेन आधी सुरु असलेल्या रेल्वे कर्मचारी स्पेशल ट्रेन वगळून आहेत. मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा, कर्जत, कल्याण आणि ठाणे या मेनलाईनवर 130 उपनगरीय सेवा धावतील तर उर्वरित 70 सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या हार्बर मार्गावर धावणार आहेत.