धक्कादायक ! …नाहीतर हैदराबादसारखी अवस्था होईल, महाराष्ट्रातील डॉक्टर महिलेला 2 युवकांची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरीतली जिल्ला आयव्हीएफ क्लिनीकच्या एका महिला डॉक्टरला हैद्राबादमधील महिला डॉक्टरसारखे हाल करण्याची धमकी मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. “देशात सध्या डॉक्टरांचे खराब दिवस सुरु आहेत. तुमच्या विरोधात एका महिलेनं आमच्याकडे तक्रार केली आहे. परंतु बदनामी टाळायची असेल तर एक कोटी रुपये द्या. नाहीतर हैद्राबादमधील डॉक्टर महिलेसोबत झालं तशीच तुमची अवस्था होईल.” अशी धमकी मिळाल्यानंतर महिला डॉक्टरानं पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर डी. एन. नगर पोलिसांनी 3 कथित पत्रकारांना गुरुवारी अटक केली आहे.

सदर महिला डॉक्टरांचं जिल्ला आयव्हीएफ क्लिनीक अंधेरी लिंक रोड, चार बाजार येथे कार्यरत आहे. या ठिकाणी महिला डॉक्टर आणि तिचा फार्मासिस्ट भाऊ काम करत होते. यावेळी दोन तरुण तिथे आले. आम्ही ‘मुंबई आवाज वेब न्यूज’ या वेब पोर्टलमधून आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. तुमच्या विरोधात एका महिलेनं आमच्याकडे तक्रार केली आहे आणि आम्ही त्याची बातमी करण्यासाठी आलो आहोत. पोलीस आयुक्तांनीच आमच्याकडे ही तक्रार दिली आहे असंही त्यांनी महिला डॉक्टर आणि तिच्या भावाला भासवलं.

सदर दोन्हीही तरुणांनी महिलेच्या भावाला चार बंगला इथे नेलं. एका कार्यालयात नेत संपादक म्हणून एकाची ओळखही करून दिली. ‘जर बदनामी टाळायची असेल तर एक कोटी रुपये द्या नाहीतर तुमची बातमी करू. डॉक्टरांचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत. सांभाळून रहा. हैद्राबादमध्ये काय झालं याची कल्पना आहे ना’ अशी धमकी त्या संपादकानं दिली. यानंतर महिलेच्या भावाला पुन्हा क्लिनीकमध्ये सोडण्यात आलं.

सदर भावानं सर्व प्रकार आपल्या बहिणीला कथन केला. यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी अपहरण, खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय महेश, चेतन आणि शैलेश अशा तीन कथित पत्रकारांना डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/