दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्यासाठी महापालिकेत हालचाली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

न्यायालयाच्या आदेशामुळे दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देता येत नसल्याचे कारण पुढे करत पिंपरी-चिंचवड महापालिका यंदाच्या आषाढी वारीत परंपरा खंडीत करत आहे. मात्र यावर चारी बाजूने होऊ लागलेली टिका आणि राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका यामुळे सत्ताधा-यांना ‘युटर्न’ घ्यावा लागला आहे. सर्वपक्षीय नगरसेवक, आमदारांचे मानधन देऊन दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्यासाठी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची सोमवारी (दि.2) बैठक बोलवली आहे. यामध्ये त्यांच्याशी चर्चा करुन ठरवण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

आषाढी वारीतील संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी भेटवस्तू देऊन सन्मान केला जात होता. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा यंदा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे वृत्त ‘पोलिसनामा ऑनलाईन’वर प्रसिद्ध झाले. त्यानंतर राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी टिका केली. यानंतर सत्ताधारी थोडे नरमले.

[amazon_link asins=’B071CMQ6N2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c0d09b8-7cf6-11e8-bbbf-9597ba093124′]

महापौर नितीन काळजे यांनी सूचना करूनही प्रशासनाने या खरेदीबाबत प्रक्रिया केली नाही. त्यांच्याकडून उत्सव, महोत्सवावरील पालिका तिजोरीतून खर्च करण्यास न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्बंध आल्याचे कारण देण्यात आले आहे. सत्ताधारी भाजपच्या काळात ही पंरपरा खंडीत होत असून भाजप पदाधिकारी नास्तिक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला होता. तसेच, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मानधनातून भेटवस्तू देण्याच्या सूचना साने यांनी दिली होती.

या आरोपानंतर प्रत्युत्तर देताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नगरसेवक, आमदारांच्या मानधन वापरून त्यातून वारक-यांना भेटवस्तू देऊन ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू असे जाहीर केले. न्यायालयाच्या आदेशामुळे भेटवस्तू देता येत नसल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपच्या दोन्ही आमदार, सर्व नगरसेवकांची वारक-यांना भेटवस्तू देण्यासाठी मानधनाची रक्कम देण्याची तयारी आहे. तसेच, सर्वपक्षीय नगरसेवक देखील त्याला तयार असल्यास या मानधनाच्या रकमेतून भेटवस्तू दिली जाईल. त्यासाठी सोमवारी महापालिकेत गटनेत्यांची बैठक होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.