१० वर्षांपासून फरार खूनातील आरोपीला पुण्यात पकडले 

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड शहरातील दत्तनगर भागातील रहिवासी असलेल्या मिलिंद अशोकराव मातेकर या दहा वर्षांपासून फरार आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. पैशाच्या देवाणघेवाणीवरुन धारदार शस्त्राने मारहाण करुन एकाचा खून करून तो गेल्या दहा वर्षांपासून फरार होता. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शरदवाडी येथून त्याला अटक करण्यात आली.

अधिक माहिती अशी, की २०१० मध्ये मिलिंद अशोक मातेकर (रा.दत्तनगर) याने पैशाच्या देवाण-घेवाणावरुन बंडू नारायण फटाले (रा.दत्तनगर) याचा दगडाने व धारदार शस्त्राने मारहाण करुन खून केला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. खून करुन तो दहा वर्षांपासून फरार होता. मिलिंद मातेकर पुणे येथील कोरेगाव भागातील शरदवाडी येथे मुस्लिम धर्म स्वीकारुन आणि सय्यद फिरोज सय्यद शाहदत या नावाने राहत असल्याची माहिती नांदेडच्या स्थागुशाच्या पथकाला मिळाली.

या माहितीवरुन स्थागुशाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे, पो.ना. राजू पांगरकर, जमादार बालाजी सातपुते, शेख जावेद, विजय आडे, तानाजी येळगे, सपोउपनि शाहू, जमादार दशरथ जांभळीकर, जमादार घुंगरुसिंग टाक यांच्या पथकाने पकडून त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.