भुसावळ : कौटुंबिक वादातून सासर्‍याचा खून; जावयाला अटक

पोलिसनामा ऑनलाईन, भुसावळ – कौटुंबिक कलहातून जावयाने सासर्‍याची हत्या केल्याची घटना 5 डिसेंबर 20 रोजी अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील निमवाडी येथे घडली होती. या गुन्ह्यात पसार असलेला संशयित आरोपी जावायास भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरून रविवारी ताब्यात घेतले आहे.

श्रीराम बाबूराव सपकाळ (चांदूर) असे मयताचे नाव आहे. तर, मनोज शिवचरन इंगळे (कापशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी ग्वाल्हेर येथून भुसावळ येथे येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

श्रीराम सपकाळ यांची कौटुंबिक कलहातून त्यांचा जावई मनोज इंगळे याने 5 डिसेंबर 20 रोजी हत्या केली होती. आरोपी मनोजचा शोध सुरू केल्यानंतर तो मुंबईमध्ये असल्याचे कळताच पथक तेथे गेले मात्र, आरोपी तेथून नागपूर निसटला. तेथेही तो आढळला नाही. आरोपी शिवचरण इंगळे हा भुसावळ येथे येणार आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली.

आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी.सी.खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलीय.