Pune News : हिंजवडीत हत्याराने मारहाण, मित्रांनी केला खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  मुळशी तालुक्यातील नेरेदत्तवाडी येथे हत्याराने कपाळावर, हातावर, छातीवर मारहाण करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. गणेश रामदास पिंजण (वय ३५, रा. कासारसाई, ता. मुळशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत दिनेश रामदास पिंजण (वय ३३, रा. नेरेदत्तवाडी, ता मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. तर नवनाथ शेडगे व ऋषिकेश भिंताडे (दोघे रा. कासारसाई) अशी आरोपींची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत गणेश हा फिर्यादी दिनेश यांचा भाऊ असून, आरोपी शेडगे व भिंताडे हे मयत गणेशचे मित्र आहेत. अज्ञात कारणावरुन आरोपींनी धारदार हत्याराने कपाळावर, हातावर व छातीवर वार करुन गणेश यांना गंभीर जखमी करत खून केला. नंतर गणेशाचा मृतदेह नेरेदत्तवाडी परिसरातील मोकळ्या जागेत फेकून दिला. पोलीस पुढील तपास करत आहेत.