खळबळजनक ! एसटी वाहक तरुणीची गळा चिरून हत्या

चिखली (बुलडाणा) : पोलीसनामा ऑनलाइन – २५ वर्षीय घटस्फोटीत तरूणीचा तालुक्यातील अंत्री खेडेकर शिवरात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही तरूणी बुलडाणा आगारात वाहक म्हणून कार्यरत होत्या. मृतक तरूणीच्या गळ्यावर तसेच शरीरावर धारधार शस्त्राने वार केल्याचे व अंगावर चटके दिल्याच्या खूणा आहेत. त्यामुळे तिचा खून झाला असल्याचा कयास व्यक्त केला जात असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

माधुरी भीमराव मोरे (२५, रा. अंत्री खेडेकर) असे मृत तरूणीचे नाव आहे. बुलडाणा आगारात वाहक पदावर त्या कार्यरत होत्या. १५ एप्रिलची ड्यूटी संपल्यानंतर आठवडी सुटी असल्याने अंत्री खेडेकरला घरी परतणार होत्या. मात्र, रात्री त्या घरी पोहचल्या नाही. १६ एप्रिलच्या सकाळी अंत्री खेडेकर शिवरात मॉर्निंग वाकसाठी गेलेल्या नागरीकांना त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत अंढेरा पोलिसांना माहिती दिली असता ठाणेदार राजरत्न आठवले यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

तरूणीचा गळा चिरलेला व शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तसेच चटके दिल्याच्या खूणा पार्थिवार आढळून आल्या आहेत. घटनेचे गांभिर्य पाहता बुलडाणा येथून श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून आवश्यक अशी माहिती व काही पुरावे हस्तगत केले आहेत. मृत महिला माधुरी मोरे यांचा ५ वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. यापूर्वी त्या जाफ्राबादार आगारात कार्यरत होत्या.