खाण व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या

अकोला : अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या अप्पू टी पॉईंट जवळ मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून एका खाण व्यवस्थापकाची हत्या केली आहे. गोपाळ अग्रवाल असे या खाण व्यावसायिकाचे नाव आहे.

अकोला एमआयडीसी परिसरात असलेल्या अप्पू टी पॉईंटजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली. गिट्टी खदानवरील व्यवस्थापक गोपाळ अग्रवाल हे शनिवारी रात्री जात असताना दोन मोटारसायकलवरुन आलेल्यांनी अग्रवाल यांच्यावर जवळून ३ गोळ्या झाडून पळून गेले. गोळीबारानंतर लोकांनी हल्लेखोरांना पळून जाताना पाहिले तेव्हा त्यांच्या हातात एक बॅग पाहिली. या हल्ल्यात गोपाल अग्रवाल हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्रवाल यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अकोला पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.