Pune : पेरणेफाटा येथे तरुणावर हल्ला, अपहरण व खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात

शिक्रापुर – पुणे नगर महामार्गालगत पेरणे फाटा येथे शिवबा संघटनेचे पदाधिकारी गोविंद भिवाजी कुमकर (वय ४०) यांच्यावर आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला व अपहरण करून त्यांचा खुन केला. लोणीकंद पोलीसांनी हल्ला, अपहरण व खूनप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी सौ. सुषमा गोविंद कुमकर यांनी फिर्याद दिली असून याबाबत लोणीकंद पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी : आज सकाळी दहाच्या सुमारास गोविंद कुमकर हे घरातून बाहेर पडून पेरणेफाटा येथे पुणे-नगर रस्त्यालगत संतकृपा कॉम्प्लेचे समोर आले असताना अचानक अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. तसेच स्कॉर्पियो जीपमधून त्यांचे अपहरणही केले. भरदिवसा अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात घबराट उडाली.

घटनास्थळी उभी असलेली त्यांची होंडा सिव्हीक मोटार (क्र. एम. एच. १२ जी. के. ८१७६), संतकृपा बिल्डींगमध्ये जाणाऱ्या पायऱ्यांवर सांडलेले रक्त, हातावरील घडयाळ, एक चष्मा, व एक मोबाईल या साहीत्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. पोलिसांनी काही संशयितांना तपासासाठी ताब्यात घेवून तपासपथकेही तयार केली.

या हल्ल्यामागे नेमके कोण व हल्लेखोरांचा काय उद्देश होता, याचा पोलिस पथक शोध घेत आहे. दरम्यान सायंकाळी उशिरा कुमकर यांचा मृतदेह वाडेबोल्हाई गावच्या पुढे पिंपरी सांडस हद्दीत वनविभागाच्या हददीत आढळून आला. अधिक तपास पुणे ग्रामीण पोलिस आधिक्षक डाॕ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोणिकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर हे करीत आहेत.