मोठी बातमी : केरळमधील मुस्लिम काॅलेजमध्ये ‘बुरखाबंदी’ ; राज्यात खळबळ

तिरुवनंतरपुरम : वृत्तसंस्था – बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेने बुरखा घालण्यावर बंदी घातल्यानंतर त्यावर भारतात सर्वत्र नव्याने चर्चा सुरु झाली आहे. त्यातच केरळमधील एका मुस्लिम शैक्षणिक संस्थेने आपल्या परिसरात चेहरा झाकणारा बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे.

कोझिकोडमधील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी (एमईएस)ने एक सूचना प्रसिद्धीला दिली असून त्यात त्यांनी आपल्या विद्यार्थीनींना अपिल केले आहे की, चेहरा झाकणारा कोणताही कपडा परिधान करुन क्लासमध्ये येऊ नये. एमईएस हा एक प्रगतीशील समूह असून त्यांच्याकडून अनेक व्यावसायिक कॉलेजसह शिक्षण संस्था चालविल्या जातात.

या आदेशातील ड्रेस कोडला रुढीवादी मुस्लिम संगठना आणि विद्वानांनी विरोध सुरु केला आहे. एमई एस संस्थेचे अध्यक्ष पी. के. फजल गफूर यांनी सांगितले की, हा आदेश २०१९ -२० या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे. धार्मिक कट्टरपंथाच्या नावावर ड्रेस कोड लागू करायला एमईएस तयार नाही. महिलांचा चेहरा झाकण्याची ही नवी पद्धत आहे. राज्यात या समुदायामध्ये पूर्वी हे नव्हते. एमईएस आपला निर्णय मागे घेणार नसून त्यावर अंमलबजावणी होईल.

एमईएसच्या निर्णयावर टिका करताना एका मुस्लिम रुढीवादी संघटनेने सांगितले की, हा आदेश गैर इस्लामिक आहे. तो मागे घेतला पाहिजे. संस्थेचे सदस्य उमर फैज यांनी सांगितले की, इस्लामिक नियमानुसार महिलांच्या शरीराचे कोणतेही अंग दिसले नाही पाहिजे. चेहरा झाकण्याच्या कपड्यावर प्रतिबंध घालण्याचा एमईएसला कोणताही अधिकारी नाही.

संस्थेच्या या निर्णयामुळे केरळमध्ये खळबळ माजली असून त्याला जसा विरोध होतो, तसाच पाठिंबा देणारेही पुढे येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सामना तील अग्रलेखात बुरख्यावर बंदी घालण्याची मोदी सरकारकडे मागणी केली होती. त्याला विरोध होऊ लागताच शिवसेनेने माघार घेतली. हे शिवसेनेचे मत नसून ते कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे मत असल्याचा खुलासा केला होता.