जणू देवच पावला ! कर्फ्यूमध्ये ‘तो’ गर्भवती महिलेच्या मदतीला धावला

हैलाकांडी : वृत्तसंस्था – हिंदू-मुस्लिम धर्माच्या नावाखाली दंगे घडवून धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करणाऱ्यांची या जगात कमी नाही. मात्र हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारी घटना आसामच्या हैलाकांडीत घडली. जिल्ह्यात जातीय तणाव असल्याने पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती. या सगळ्या गडबडीत एका गर्भवती महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी वाहन उपलब्ध होत नव्हतं. अशा परिस्थितीत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने त्या महिलेची मदत केली. यामुळे महिला वेळेवर रुग्णालयात पोहोचल्यानं तिची व्यवस्थित प्रसूती झाली. तिने एका बाळाला जन्म दिला आहे.

ही घटना हैलाकांडीत रविवारी घडली. या महिलेच्या घरी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्याने हा प्रकार उघड झाला. संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने नंदिता यांना दवाखान्यात नेण्यासाठी वाहन उपलब्ध होत नव्हते. यामुळे त्यांचे पती रुबन दास चिंतेत होते. या दोघांनी अनेकांना फोन करून मदत मागितली. त्यांच्या मदतीला कुणीच आले नाही. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे मकबूल हुसेन लस्कर मदतीला धावला. कसलाही विचार न करता आणि आपला जीव धोक्यात घालून त्यांच्या पत्नीला दवाखान्यात नेले.

या घटनेविषयी बोलताना मकबूल यांनी सांगितले कि, रुबन हा माझा मित्र आहे. त्यांच्या पत्नीला प्रचंड वेदना होत होत्या, त्यामुळे मी रिक्षा काढून त्यांना दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. २० मिनिटांत आम्ही दवाखान्यात गेलो. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत प्रसूती झाली. वेळेवर मदतीला धावल्याबद्दल रुबन यांनी मकबूल यांचे आभार मानले. नंदिता आणि रुबन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. रुग्णालय प्रशासनाने देखील मकबूल यांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.