‘माझं कुटुंब, माझी महाविकास आघाडी’ : सुप्रिया सुळे

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात हे खरं आहे. पण लक्षात ठेवा, तीच नवरी वर्षभरानंतर त्या घराची मालकीण होते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

पुण्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगांवकर यांच्या प्रचारा निमित्त एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतानाच विविध मुद्द्यांवर मते मांडली. नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात हे खरं आहे. पण तीच नवरी वर्षभरानंतर त्या घराची मालकीण होते, असा टोला त्यांनी लगावला. कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री म्हणतात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’. पण मी म्हणते, ‘माझं कुटुंब, माझी महाविकास आघाडी’, ‘माझा पक्ष, माझी जबाबदारी’, असं सांगतानाच महाविकास आघाडी सरकार खूप चांगलं काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

कोव्हिड काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे हा माझा भाऊ गावागावात माहीत झाला. कोव्हिड काळात पीपीई किट घालून मालेगावला भेट देणारा हा पहिलाच मंत्री आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कोरोना झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:ला पाच दिवस घरात कोंडून ठेवून उपचार घेतले. त्यामुळे त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात पाठवण्यात आलं, असं सांगतानाच कोरोनामुळे दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे आणि अजितदादा ब्रीच कँडीत उपचार घेत होते, असं त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात शिवसेनेच्या अनुपस्थिती बाबत कुजबूज सुरू असतानाच सुप्रिया सुळे म्हणाल्या शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आले नाहित कारण शिवसेनेच्या जिल्हाअध्यक्षाला खोकला झालाय. खोकला झाल्याने ते न आलेलेच बरे ! कोणी यातुन काही वेगळा अर्थ न काढता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आपल्या बरोबर आहेत. हे महत्त्वाचे आहे.

यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीत कोल्हापूरचा उमेदवार दिल्याच्या निर्णयाचंही समर्थन केलं. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा चालतो, कोल्हापुरी मटण चालते, कोल्हापुरी लोणचं चालतं, कोल्हापुरी चप्पलही चालते मग कोल्हापूरचा उमदेवार का नको?, असा सवाल त्यांनी केला. सांगली, कोल्हापूरचा उमदेवार म्हणजे लांबचा उमेदवार हे आधी डोक्यातून काढून टाका. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचेच होते ना? असा सवालही त्यांनी केला.