जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर : पोलीसानामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूका पार पडल्‍या असून भारतीय जनता पक्षाचे बहुमताचे सरकार स्‍थापन होणार आहे. त्‍या अनुषंगाने काही उत्‍साही कार्यकर्ते मिरवणुका काढून किंवा फटाके वाजून आनंदोत्‍सव साजरा करण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते व त्‍यांचे मध्‍ये किरकोळ कारणावरुन वाद होवून कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

तसेच दिनांक 7 मे 2019 रोजीपासून मुस्‍लीम धर्मिंयांचा पवित्र रमजान महिना चालू झालेला आहे. दिनांक 5 जून 2019 रोजी चंद्र दर्शनावर अवलंबून एक दिवस मागे पुढे रजमान ईद हा सण अहमदनगर शहरात व ग्रामीण भागात मोठया उत्‍साहाने साजरा होणार आहे. या दिवशी मुस्‍लीम धर्मीयांच्‍या वतीने इदगाहमध्‍ये मोठया जनसंख्‍येमध्‍ये नमाज पठणाचा कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही कायदा व सुवव्‍यस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. पोलिसांना कर्तव्‍य बजावतांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी अहमदनगर जिल्‍हयात महसूल स्‍थळ सिमेच्‍या हद्दीत दिनांक 29 मे 2019 रोजी 00.00 वाजेपासून दिनांक 11 जून 2019 रोजीचे 24 वाजेपर्यत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केला आहे.

जिल्‍हादंडाधिकारी श्री. द्विवेदी यांनी त्यांना मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य सक्षम अधिका-यांच्‍या पूर्व परवानगी शिवाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात शस्‍त्रे, काठया सोटे, तलवारी, बंदुका, भाले,सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे बरोबर नेणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे घेवून फिरणे, कोणत्‍याही व्‍यक्‍तींच्‍या आकृत्‍या किंवा त्‍यांच्‍या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे किंवा तयार करणे, जाहिरपणे घोषणा देणे, गाणे म्‍हणणे, वाद्य वाजविणे, ध्‍वनिवर्धक किंवा ध्‍वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्‍या तसा ऐकवणारा उपकरणसंच वापरणे किंवा वाजवणे, सभ्‍यता अगर नितीमत्‍ता आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चिन्‍हे किंवा इतर वसतू तयार करणे किंवा त्‍याचा प्रचार करणे, सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचाराचे तसेच अन्‍य कारणास्‍तव सभा घेणेस, मिरवणुका काढण्‍यास व पाच पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई करण्‍यात येत आहे.

शासकीय सेवेतील व्‍यक्‍तीना ज्‍यांना आपले वरिष्‍ठांचे आदेशानुसार कर्तव्‍य पुर्तीसाठी हत्‍यारजवळ बाळगणे आवश्‍यक आहे. तसेच ज्‍या व्‍यक्‍तींना शारिरीक दुर्बलतेच्‍या कारणास्‍तव लाठी अगर काठी वापणे आवश्‍यक आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धर्मिक मिरवणुका, लग्‍नसमारंभ, लग्‍नाच्‍या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेणेस अगर मिरवणूक काढण्‍यास ज्‍यांनी संबंधीत प्रभारी पोलिस निरीक्षक तथा सहाय्य पोलिस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्‍यक्‍तींना आदेश लागू होणार नाही. सदरचा आदेश अहमदनगर जिल्‍हयात महसूल स्‍थळ सिमेच्‍या हद्दीत दिनांक 01 मे 2019 रोजी 00.00 वा. पासून दिनांक 14 मे 2019 रोजीचे 24 वा. पावेतोचे कालावधीत जारी राहील असे ही एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.