प्रियंकाजी नागपूरमधूनच निवडणूक लढवा ! हाय कमांडना पत्र

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. प्रियंका गांधींच्या राजकीय प्रवेशानंतर काँगेसच्या नेत्यांमध्ये नवा उत्साह भरला आहे. काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ नंदुरबार मधून प्रियंका गांधी फोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना आता प्रियंका गांधी यांनी नागपुरातून निवडणूक लढवावी अशी मागणी नागपूर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी हाय कमांड कडे म्हणजेच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

नुकतेच पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले आहे. दरम्यान २०१९ च्या निवडणुकीत जनसमर्थाचा फायदा उचलण्यासाठी प्रियंका गांधींनी नागपुरातून निवडणूक लढवावीअसे सांगत नागपूर काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिलं आहे. तसेच नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. तर कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. चार वर्षांत गटबाजीत सुधारणा झाली नाही, अशी व्यथा देखील सिंगलकरांनी पत्राद्वारे मांडली आहे.

काँग्रेस पुन्हा भरारी घेण्यासाठी प्रियंकांचाच आधार

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये आता पक्ष खिळखिळा झाला आहे. त्यामुळेच मागील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत पुन्हा काँग्रेसला भरारी घ्यायची असेल, तर प्रियंका गांधींनी इथून निवडणूक लढवणं गरजेचं असल्याचं सिंगलकर यांनी पत्रात म्हटलं आहे. प्रियंका गांधींना समर्थन देण्यासाठी सर्व गट एकत्र येतील, असा विश्वास सिंगलकरांनी व्यक्त केला आहे.