अन् अजित पवारांच्या भाषणा आधीच प्रेक्षक जेवणावर तुटून पडले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन  – कोणत्याही कार्यक्रमात नेत्यांचे भाषण लांबले तर तो कार्यक्रम कंटाळवाणा होतो. असाच  काहीसा प्रकार नागपूर येथील एका कार्यक्रमात घडला. नागपुरातील काटोलमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रमुख वक्ते अजित पवार आणि मुकुल वासनिक यांच्या भाषणा आधीच प्रेक्षकांचा संयम तुटला आणि प्रेक्षकांनी जेवणावर ताव मारण्याकरिता अक्षरशः  एकच गर्दी केली.
या कार्यक्रमा दरम्यान , नेत्यांची भाषणे होऊ द्या, असं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते प्रेक्षकांना सांगत होते. मात्र तीन वाजेपर्यंत जेवण सुरु न केल्यामुळे वैतागलेल्या प्रेक्षकांनी अक्षरशः जेवणाची ताटं आणि जिन्नस हिसकावून घेत जेवायला सुरुवात केली.आयोजक कार्यकर्त्यांनीही प्रेक्षकांच्या भूकेपुढे नमतं घेतलं आणि बाजूला होणं पसंत केलं. त्यामुळे जेवणाचे पेंडॉल पूर्णपणे आपल्या ताब्यात घेत प्रेक्षकांनी जेवणावर ताव मारला.
काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मंत्री अनिल देशमुख या दोघांनी प्रत्येकी एक-एक तास भाषण ठोकल्यामुळे कार्यक्रम लांबला आणि प्रेक्षक कंटाळले होते.
आशिष देशमुखांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 
भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश करण्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला विदर्भात खूप मोठा धक्का बसला आहे. आशिष देशमुख यांच्यासोबत राजस्थानातून जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीलाच आशिष देशमुख यांनी ई-मेलच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. राजीनामा दिल्यानंतर वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरसभेत व्यासपीठावर हजेरी लावल्याने आशिष देशमुख यांची काँग्रेस प्रवेश नक्की मानला जात होता. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मंचावर जाऊन भेट घेतली होती. 3 ऑक्टोबर रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपवला होता.