‘गडकरी नव्हे तर यावेळीही मोदीच पंतप्रधान होतील’ : ‘या’ नेत्याचे वक्तव्य

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – गडकरी नव्हे तर यावेळीही मोदीच पंतप्रधान होतील असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. ‘येत्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मिळतील आणि सद्यस्थितीत तेच पंतप्रधान होतील’ असे ते म्हणाले.

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी की नितीन गडकरी असा प्रश्न आठवले यांना विचारला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “नितीन गडकरी माझे चांगले मित्र आणि अतिशय ‘अॅक्टिव्ह’ मंत्री आहेत. मिळालेल्या खात्याचे त्यांनी सोने केले. तथापि, सद्यस्थितीत नरेंद्र मोदीच परत पंतप्रधान होतील. गडकरी २०२४ साली पंतप्रधान होऊ शकतात” असे आठवले म्हणाले.

आंबेडकरांनी महायुतीत सहभागी होऊन सत्तेचा लाभ घ्यावा

वंचित बहुजन आघाडीवर भाष्य करताना त्यांनी आघाडीचे प्रणेते व भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना खोचक सल्लाही दिला. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मतविभाजनाद्वारे भाजपला अप्रत्यक्ष लाभ पोहोचवण्याऐवजी थेट महायुतीत सहभागी होऊन सत्तेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले. आठवले म्हणाले की, “अप्रत्यक्षपणे मतांचे विभाजन टाळून थेट युतीत आल्यास दोन-तीन जणांना मंत्री होता येईल. आमच्यासोबत आल्यास त्यांना सत्तेचा मार्ग मिळेल. काँग्रेस आघाडीसोबत गेले तरी, वंचितला फायदा होणार नाही” असेही ते म्हणाले.

म्हणून आंबेडकरांच्या पोटात गोळा उठला आहे

आठवले एका पत्रकार परिषदेत बोलत होते. आंबेडकर यांनी आठवले संधीसाधू असल्याची टीका केली होती. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता यावरही त्यांनी भाष्य केले. यावर बोलताना ते म्हणाले की, “होय, मी संधीसाधू आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी सत्तेचा मार्ग सांगितला. त्यानुसार माझी वाटचाल आहे. मी ज्यांच्यासोबत जातो त्यांची सत्ता येते, ते ज्यांच्यासोबत असतात त्यांना विरोधी पक्षात राहावे लागते, म्हणून त्यांच्या पोटात गोळा उठला आहे” असा टोलाही आठवले यांनी लगावला.

युती न झाल्यास आपण भाजपसोबत राहणार

भाजप-शिवसेनेच्या युतीवरूनही त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. ते म्हणाले की, “भाजप-शिवसेनेची युती व्हावी, असे आपले प्रयत्न राहतील. उभय पक्षांनी लहान-मोठ्या भावाचा मुद्दा ताणू नये. आधी शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होती, आता भाजप पहिल्या क्रमांकावर असल्याने मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. मात्र, युती न झाल्यास आपण भाजपसोबत राहणार आहोत” असं त्यांनी स्पष्ट केले.

केवळ इंदिरा गांधी यांच्यासारखं दिसून चालत नाही, तसे कामही करावे लागते

रामदास आठवले म्हणाले की, “उत्तर प्रदेशात काँग्रेसमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा भाजपला होईल. प्रियांका गांधी या इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसत असल्या तरी दिसून चालत नाही, त्यांच्यासारखे काम करावे लागेल” असेही आठवले म्हणाले.

राम मंदिर व्हावे, पण…

अयोध्येतील राम मंदिराबाबत बोलताना ते म्हणाले की, “अयोध्येत राममंदिर व्हावे, मात्र कायदा हातात घेण्यात येऊ नये. वादग्रस्त जमिनीचे योग्य विभाजन करून मंदिर, मशीद आणि बौद्धविहार बांधण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयानेदेखील लवकर निर्णय द्यावा” असेही रामदास आठवले म्हणाले.

कमळ नको!

लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत सेनेकडे असलेला दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मागितला आहे. मात्र, ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर नाही तर, आमच्याच चिन्हावर लढू” असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, बाळू घरडे, राजन वाघमारे, भीमराव बन्सोड, सुधाकर तायडे, एल.के. मडावी आदी उपस्थित होते.

You might also like