नागपूरचा वाघ झाला मुंबईत दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा वन क्षेत्रात बंदिस्त करण्यात आलेल्या आरटी १ या नर वाघाला शनिवारी सकाळी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुखरुप आणण्यात आले. ७ वर्षीय हा नर वाघ पकडल्यापासून नागपूरमधील वन्यप्राणी बचाव केंद्रात होता.

याबाबत बोलताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन संरक्षक व संचालक मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या वाघाच्या स्तलांतराबद्दल परवानगी दिली. त्यानुसार उद्यानातील एका चमूने सर्व काळजी घेत, नियमांचे पालन करत या वाघाला शनिवारी पहाटे मुंबईत आणले. तीन दिवसांच्या प्रवासात वाघाची काळजी घेतली गेली. त्याला वेळेवर अन्न व पाणी दिले गेले होते.

प्रवासाचा ताण जाणवू नये म्हणून वेळोवेळी आराम देण्यात आला. संग्रालयात दाखल झाल्यानंतर वाघाची आरोग्य तपासणी केली असून, ती अगदी उत्तम आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारच्या नियमानुसार वाघास विलगीकरणात ठेवले आहे. पुढील व्यवस्थापन होईपर्यंत त्याची सर्व काळजी घेतली जाईल.