रक्षक की भक्षक ! 44 वर्षीय विधवा महिलेचं ‘लैंगिक’ शोषण करणाऱ्या पोलिसाविरोधात FIR

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न करण्याचे आमिष दाखवून एका 44 वर्षीय विधवा महिलेचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी हेड कॉन्स्टबल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी हेड कॉन्स्टेबल राजेश वसंतराव मेहर (वय – 52 रा. लोधी लेआउट, भगवाननगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजेश मेहर हे पोलीस मुख्यालयात तैनात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विधवा असून तिला मुलगी आहे. ती लकडगंज भागात राहते. सप्टेंबर 2015 मध्ये तिची राजेश यांच्यासोबत ओळख झाली. विवाहित असताना देखील राजेश यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलीचा सांभाळ करण्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. काही वर्षे त्याने महिलेला घरखर्चासाठी व मुलीच्या शिक्षणासाठी पैसे दिले.

दरम्यान महिलेने राजेश यांच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. त्याने तिला कोराडी मंदिरात नेऊन त्याठिकाणी तिच्यासोबत लग्न केले. तसेच लग्नाचे फोटो देखील काढले. त्यानंतर त्याने तिचे शारीरिक शोषण केले. काही दिवसांपासून राजेश याने महिलेसोबत असलेले संबंध तोडले. महिलने त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तिला टाळले.

यानंतर महिलेने लकडगंज पोलीस ठाण्यात राजेश मेहर विरोधात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तिची तक्रार दाखल करुन घेतली नसल्याने अखेर तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने राजेश मेहर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश लकडगंज पोलिसांना दिले. त्यानंतर लकडगंज पोलिसांनी राजेश मेहर विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.