नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे या मागणीचे निवेदन आज (सोमवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही राज्याच्या विकासाच्या गाडीचा वेग मंदावू न देण्याची दक्षता घेण्यात आली. यामुळेच राज्यात उद्योग क्षेत्राशी निगडीत 61 हजार कोटीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. निर्धारित वेळेत हे विमानतळ जनतेच्या सेवेत रुजू करण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे. या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मराठी माणसाला आत्मभान देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे हा त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे. असे नामकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी विनंतीही एकनाथ शिंदे यांनी निवेदनात केली आहे.