राम मंदिरापेक्षा गरीबाला दोन घास मिळणं महत्त्वाचं : नाना पाटेकर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशभर राम मंदिराच्या  मुद्यावरून राजकारण तापले आहे. चर्चेत असणाऱ्या या राममंदिराच्या निर्मितीवरुन अभिनेते नाना पाटेकर यांनी भाष्य केलं आहे. ‘काही जणांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. पण मला मात्र एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मंदिरात गेल्यासारखंच वाटेल, ‘असं मत नानांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात मांडलं आहे.
राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे आज उद्घाटन करण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते हे उदघाटन झाले.  या कार्यक्रमात नानांनी विविध विषयांवर आपली मत मांडली.
नाना  म्हणाले की , ‘काही जणांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. पण एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मला मंदिरात गेल्यासारखंच वाटेल. त्यामुळे कोण कसं विचार करतं यावर सगळं अवलंबून आहे. काहींना राम मंदिर बांधावंसं वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे.’
शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबतही नाना बोलले. शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होत नसतील म्हणून हे मोर्चे निघतात. शेतकऱ्यांसाठी एकटं सरकार सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात पुढे करायला हवा.
यंदा राज्यात दुष्काळ आहे, मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. नाइलाजाने गावाकडील लोक आज शहरात येत आहेत, ती भिकारी नाहीत. त्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले. दिल्लीत शेतकरी मोर्चा निघाला. हे पाहता शेतकऱ्यांना संस्थांनी मदत करावी. तसेच कोणतंही सरकार जनतेच्या चागंल्यासाठी काम करत असतं. मात्र सगळ्या गोष्टी करणे सरकारला शक्य नसल्याने त्यांना आपण सहकार्य करणे गरजेचं आहे. मात्र मी कोणत्याही पक्षाचा नसल्याचंही नाना पाटेकरांनी यावेळी स्पष्ट केलं.
पुण्यात खडकवासला धरणातील गाळ उपसा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची ‘नाम’ संस्थाही सहभागी झाली आहे.  यावेळी नाम फाऊंडेशनकडून पाच पोकलन या उपक्रमासाठी देण्यात आले. ग्रीनथंब संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मणेवाडी भागात धरणातील गाळ उपसा करुन वृक्षारोपण करण्यात येत आहे.