पंतप्रधान मोदींच्या बंधूंनी अमित शहांच्या मुलाबाबत केलं वक्तव्य, अन् आले चर्चेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी हे त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांचे क्रिकेटमध्ये कोणतेही योगदान नाही. मग त्यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डची जबाबदारी का दिली गेली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत प्रल्हाद मोदी यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रल्हाद मोदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या मुलाला खासदार बनवल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. अहमदाबाद नगर पालिकेच्या निवडणुकीत मोदींची भाची सोनल मोदी यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी याच मुद्द्यावर टीका केली.

आम्ही मोदींच्या फोटोचा वापर करत नाही

आम्ही पंतप्रधान मोदींच्या फोटोचा वापर करून जीवन जगत नाही. आमच्या कुटुंबातील सर्वजण मोठे कष्ट करतात आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपला खर्च चालवतात.

रेशनचे दुकान चालवतो

मोदींचे मोठे भाऊ असलेले प्रल्हाद मोदी यांनी त्यांच्या जीवनातील संघर्षाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, मी रेशनचे दुकान चालवतो आणि उपजीविका करतो.

मोदींच्या घराचा दरवाजाही माहिती नाही

जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत तेव्हापासून मी त्यांच्या घरी गेलो नाही. इतकेच नाही तर त्यांच्या घराचा दरवाजा कसा आहे, हेही माहिती नाही.

नियम सर्वांसाठी सारखेच

सोनल मोदी यांना बोदकदेव किंवा इतर कोणत्याही वॉर्डमधून उमेदवारी मिळाली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, नियम सर्वांसाठी सारखेच असतात.

सोनल मोदी म्हणाल्या…

भाजपच्या नव्या नियमानुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना यावेळी तिकीट दिले जाणार नाही. पण मला भाजप कार्यकर्ती म्हणून तिकीट मिळायला हवे होते, अशी भावना सोनल मोदी यांनी व्यक्त केली.