केंद्र सरकार जातीय भेद निर्माण करत आहेत : ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप 

श्रीनगर : वृत्तसंस्था – ‘मुस्लिम आणि अल्पसंख्यांक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं पाहिजे की, देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नाही. हा देश सर्वांचाच आहे असे खळबळजनक विधान जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी केलं आहे.

केंद्र सरकार जातीय भेद निर्माण करत असल्याचा आरोप करताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, ‘मला वाटतं देशात दुर्घटना सुरू आहेत. आपल्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार असून अशा दुर्दैवी परिस्थितीत आपण सापडलो आहोत. आम्हाला लोकांमध्ये शांतता आणि समजूतदारपणा हवा आहे. मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष अनेक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे.’

‘मुस्लिम आणि अल्पसंख्यांक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मला वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी स्पष्ट केले पाहिजे की, देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नाही. हा देश सर्वांचाच आहे हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आपण सर्वांनी शांतता राखत एकत्र राहिले पाहिजे’, असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

पुलवामा हल्ल्यासंबंधी अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य –
जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले होते. या संदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी या दहशदवादी हल्यात फक्त पाकिस्तान जबाबदार नाही असे वादग्रस्त विधान केले होते.