Nashik News : बंगल्यात गॅस सिलेंडरचा स्फोट, नाशिकच्या घटनेत 5 जण जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सिडको परिसरातील खुटवडनगर येथील धनदाई कॉलनीमधील एका बंगल्यात सोमवारी गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात घरातील लहान मुलासह पाच जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाने तातडीने तेथे धाव घेत आग विझविली आहे. हा स्फोटा इतका भीषण होता की, घराचे दरवाजे खिडक्या आणि भिंतीही तुटल्या. खिडक्यांची तावदाने अंगणात येऊन पडली. घराबाहेर असलेल्या वाहनांच्याही काचा फुटल्या. या स्फोटात पुष्पा पगार, बळीराम पगार तसेच त्यांचा मुलगा अतुल, मुलगी अश्विनी पगार, नातू रोहन व रुची असे सर्व जण जखमी झाले आहेत.

खुटवडनगर येथील पगार कुटुंबातील पुष्पा पगार या आज सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकघरात गेल्या. त्यांना नातवासाठी पेज बनवायची होती. त्यांनी गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला. घरात अगोदरच गॅसची गळती झालेली असल्याने त्यांनी गॅस पेटविण्याचा प्रयत्न करताच मोठा स्फोट होऊन आग लागली. अग्निशामन दलाने आग विझविली असून सर्वांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.