‘एअर फोर्स’नं लॉंच केले ‘मोबाइल अ‍ॅप’, मिळेल करिअरशी संबंधित सर्व माहिती, जाणून घ्या कसे करेल काम

नवी दिल्ली,वृत्तसंस्था : एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांनी सोमवारी ‘एमवाय आयएएफ’ हे मोबाइल अ‍ॅप लॉंच केले. हे अ‍ॅप भारतीय हवाई दलात रुजू होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना करिअर संबंधित माहिती देईल. हवाई दलाने सांगितले की, डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत हवाई दलाच्या भवनात हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. हे वापरण्यास अगदी सोपे आहे. यामध्ये वायुसेनेतील अधिकारी व हवाई दलाच्या निवड प्रक्रिया, प्रशिक्षण कार्यक्रम, वेतन आणि भत्ते इत्यादींविषयी माहिती देण्यात आली आहे.

हे अ‍ॅप सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कंप्यूटिंग (सी-डॅक) च्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याची लिंक भारतीय वायुसेनेच्या सोशल मीडिया खात्याशी जोडलेली आहे. त्यात वायुसेनेच्या पराक्रमाच्या कथा आणि इतिहासातील अभिमानास्पद घटना देखील सादर करण्यात आल्या आहे.

अजून क्षमता वाढवण्याची गरज: आरकेएस भदोरिया

गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदोरिया म्हणाले होते की हवाई दलाने आपल्या कार्यक्षम क्षमतांमध्ये आणखी वाढ करण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठ हवाई अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी एअर चीफ मार्शल भदोरिया म्हणाले होते की सध्याची आव्हाने पाहता भारतीय हवाई दलाला जास्तीत जास्त कामकाजासाठी तयार राहावे लागेल. हवाई दलाच्या कमांडोंच्या तयारीवर देखील त्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यांनी सर्व सैन्याला सद्य आणि भविष्यातील हवाई कारवाईसाठी तयार राहण्यास सांगितले.

परिणाम भोगायला चीनने तयार राहावे

दुसरीकडे चीनशी झालेल्या चर्चेत भारतीय लष्कराने हे स्पष्ट केले की वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) बदलाव करण्याचा चिनी हेतू त्यांना मान्य नाही. जर चिनी सैन्य मागे सरकले नाही तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराची कठोर भूमिका पाहता चीन परत जाण्यासाठी निमित्त शोधत आहे पण त्यांना सध्या तरी ते निमित्त सापडत नाही.