उद्घाटनापुर्वीच कोसळलं जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमचं ‘गेट’, डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यक्रम ‘नियोजित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केवळ देशातील नाही तर जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम सध्या उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. या स्टेडियमच्या उद्घाटनाप्रसंगी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत. मात्र आज एक धक्कादायक घटना घडली आहे. या स्टेडिअममध्ये तात्पुरते उभे करण्यात आलेले गेट कोसळले आहे. या गेटमधून ट्रम्प जाणार होते. यामुळे ट्रम्प दौऱ्याच्या आदल्या दिवशीच सीआयए सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

या मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या गेटमधूनच ट्रम्प आणि पीएम मोदी आत जाणार होते. परंतु शनिवारी हे गेटच कोसळले आहे. गेट कोसळले तेव्हा आसपास कोणी नव्हते म्हणून दुर्घटना टळली आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशीच असा प्रकार घडला त्यामुळे याबाबत सध्या चौकशी चालू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील वर्षी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेव्हा टेक्सास येथे हाऊडी मोदी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच धर्तीवर आता हाउडी ट्रम्प हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियमचा उद्घाटनाचा कार्यक्रम या दोन बड्या नेत्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मोटेरा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता जवळपास १ लाख १० हजार इतकी आहे.

ट्रम्प या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी अहमदाबाद येथून हेलिकॉप्टरने स्टेडियमवर येणार आहेत. या उद्घाटनप्रसंगी प्रचंड गर्दी असणार आहे त्यामुळे उद्घाटनासाठी येणाऱ्या लोकांसाठी २ किलोमीटरच्या आत १७ पार्किंग प्लॉट तयार करण्यात आले आहेत. या प्लॉटमध्ये सुमारे १ हजार बसेस आणि १० हजार चारचाकी उभ्या राहतील अशी सोय करण्यात आली आहे. तसेच व्हीव्हीआयपींसाठी विशेष ४ पार्किंग प्लॉट देखील उपलब्ध करण्यात आले आहेत, सध्या ही सर्व कामे सुरू आहेत.