Corona Vaccine : ‘कोरोना’ लस प्रथम कोणाला देणार ?, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस लसची अपेक्षा जसजशी वाढत आहे, तसतशी लोकांची उत्सुकताही वाढत आहे. आता ही लस कधी तयार होईल आणि लोकांपर्यंत कधी पोहोचू शकेल हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. लोकांना कोरोना लस देण्याची संपूर्ण रूपरेषा मोदी सरकारने तयार केली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतेच सांगितले की, कोणत्या लोकांना प्रथम कोरोना विषाणूची लस दिली जाईल आणि का?

आरोग्यमंत्री म्हणाले की, आम्ही लशीच्या क्षेत्रात झपाट्याने काम करत आहोत. लस तयार करण्यात भारत जगातील कोणत्याच देशाच्या मागे नाही. पुढील वर्ष 2021 च्या सुरुवातीस ही लस भारतातील लोकांना उपलब्ध होईल. त्यांनी असेही सांगितले की, कोरोना लस तयार होईल तेव्हा आरोग्य कर्मचारी आणि वृद्ध (65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना) प्राधान्य दिले जाईल.

हर्षवर्धन म्हणाले की, पुढच्या वर्षी जुलै-ऑगस्टपर्यंत 40-50 कोटी डोस उपलब्ध होतील. त्यांच्या वितरणाची संपूर्ण रूपरेषादेखील तयार केली गेली आहे. ते म्हणाले की, “सध्याची परिस्थिती आणि विषाणूची शक्ती पाहता प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना अर्थात कोरोना वॉरियर्सना देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. मग ही लस 50-65 वर्षे वयोगटातील लाेकांना दिली जाईल.

प्रथम कोणाला लस दिली जाईल, याचा निर्णय कसा घेतला गेला? त्याला उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टिकोनातून तज्ज्ञांकडून निर्णय घेण्यात येत आहे. आम्ही यासाठी एक संपूर्ण आराखडा तयार केला आहे. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये आपल्याला काय करायचे आहे, आम्ही आधीच त्याचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे.

गुरुवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 45,576 नवीन घटनांमुळे भारतातील एकूण संख्या 89,58,483 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत कोरोना लस तयार होईपर्यंत प्रतिबंध करणे हाच एक उपाय आहे. हर्षवर्धन म्हणाले की, लोकांनी मास्क आणि शारीरिक अंतरावर पूर्ण काळजी घेतली पाहिजे. सतत हात धुणे गरजेचे आहे, तरच या जीवघेण्या व्हायरसपासून आपला बचाव होऊ शकतो.