भारताच्या संरक्षणाच्या वेगाला संपुर्ण जग करणार ‘सलाम’, हायपरसोनिक मिसाइल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी ‘झेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर वाहनाच्या ( Hypersonic Technology Demonstrator Vehicle) यशस्वी चाचणीमुळे भारतीय संरक्षण यंत्रणेला अशी गती मिळाली आहे, की ती जगातील फक्त तीन देशांशी बरोबरी करू शकते. अमेरिका, रशिया आणि चीननंतर स्वत:च्या बळावर हायपरसॉनिक तंत्रज्ञान विकसित करून भारताने आधुनिक संरक्षण यंत्रणेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.

काय आहे एचएसटीडीव्ही?
हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल (एचएसटीडीव्ही) एक स्क्रॅमजेट विमान किंवा इंजिन आहे, जे लांब पल्ल्याची आणि हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकते. त्याची गती आवाजापेक्षा सहापट जास्त आहे. म्हणजेच हे जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या शत्रूच्या ठिकाणाला काहीच वेळात लक्ष्य करू शकते. त्याचा वेग इतका आहे की, शत्रूला अडवून कारवाई करण्याची संधीही मिळत नाही. एचएसटीडीव्हीच्या यशस्वी चाचणीमुळे भारताला प्रगत तंत्रज्ञानाच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ब्रह्मोस-२ तयार करण्यात मदत होईल. हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियन स्पेस एजन्सी विकसित करत आहे.

काय आहे वैशिष्ट्य?
सामान्य क्षेपणास्त्रे बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी तंत्रज्ञानावर आधारित असतात. म्हणजेच त्यांच्या मार्गाचा सहज मागोवा घेऊन काउंटर अटॅकची तयारीही केली जाऊ शकते. याउलट हायपरसॉनिक क्षेपणास्त्र यंत्रणेचा मार्ग शोधणे अशक्य आहे. सध्या ही क्षेपणास्त्रे शोधू शकणारे कोणतेही तंत्रज्ञान नाही. मात्र बरेच देश ऊर्जा शस्त्रे, पार्टीकल बीम्स आणि नॉन-कायनॅटिक शस्त्रांद्वारे त्यांना शोधण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्र
बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बरीच मोठी असतात. ते भारी बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम असतात. या क्षेपणास्त्रांना लपवता येत नाही, म्हणून ते सोडण्यापूर्वी शत्रूकडून नष्ट केले जाऊ शकतात. मात्र क्रूझ क्षेपणास्त्र छोटी असतात आणि त्यांच्यावर चालवलेल्या बॉम्बचे वजनही कमी असते. ते लपवले जाऊ शकतात. त्यांचा मार्गक्रमही वेगळा असतो. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ऊर्ध्वाकार दिशेने लक्ष्याकडे जातात, तर क्रूझ क्षेपणास्त्र पृथ्वीला समांतर असलेला आपला मार्ग निवडतात. सोडल्यानंतर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे लक्ष्य नियंत्रणात राहत नाही, तर क्रूझ क्षेपणास्त्र अचूक लक्ष्य करते. रशियाच्या सहकार्याने भारताने ब्रह्मोस नावाचे एक क्रूझ क्षेपणास्त्र तयार केले आहे. पाकिस्तान स्वदेशी तंत्रज्ञानाने बाबर नावाचे एक क्षेपणास्त्र तयार केल्याचा दावा करत आहे. पण संरक्षण तज्ञांच्या मते ते चिनी क्रूझ क्षेपणास्त्रावर आधारित आहे.

काय आहे स्क्रॅमजेट इंजिन ?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इसरो) २८ ऑगस्ट २०१६ रोजी स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी केली होती. हे सुपरसॉनिक कॉम्ब्यूशन रॅमजेट इंजिन म्हणून देखील ओळखले जाते. वैज्ञानिकांचे मत आहे की, त्याचे वजन कमी असते, ज्यामुळे जागेचा खर्चही कमी होईल. एअर ब्रीदिंग तंत्रज्ञानावर काम करणारे हे विमान अधिक पेलोड पाठवण्यास सक्षम असेल आणि ते पुन्हा वापरताही येईल. हे अत्यंत उच्च दाब आणि उच्च तापमानात देखील काम करू शकते.

सबसॉनिक, सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिकमधील फरक
यूकेमधील संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार विश्लेषक जेम्स बॉशबोटिन्स यांच्या म्हणण्यानुसार, सबसॉनिक क्षेपणास्त्रांचा वेग ध्वनीपेक्षा कमी असतो. त्याचा ताशी वेग ७०५ मैल (१,१३४ किमी) असतो. या श्रेणीत अमेरिकेच्या टॉमहॉक, फ्रान्सच्या एक्झोसेट आणि भारताची निर्भय मिसाईल ऑफ यांचा समावेश आहे. ही क्षेपणास्त्र स्वस्त तसेच आकाराने लहान आणि रणनीतिकदृष्ट्या महत्वाची आहेत.

सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची गती ध्वनी (मॅक-३) च्या गतीपेक्षा तिप्पट असते. बर्‍याच सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची गती ताशी २,३०० मैल (सुमारे ३,७०१ किमी) वेग असते. या श्रेणीचे सर्वात लोकप्रिय क्षेपणास्त्र ब्रह्मोस आहे, ज्याची गती ताशी २,१००-२,३०० मैल (सुमारे ३३८९ ते ३,७०१ किमी) आहे. रॅमजेट इंजिन सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी वापरली जातात. हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची गती ताशी ३,८०० मैलपेक्षा जास्त असते. म्हणजेच त्याची गती ध्वनीच्या गतीपेक्षा पाच पट जास्त असते आणि याकरिता स्क्रॅमजेट म्हणजे मॅक-६ लेव्हल इंजिन वापरले जाते.