मध्यप्रदेश : राज्यपालांनी कमलनाथ यांना उद्यापर्यंत फ्लोर टेस्‍ट करण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार आणि राज्यपाल लाल जी टंडन पुन्हा एकदा समोरासमोर उभे आहेत. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी सीएम कमलनाथ यांना पत्र लिहीत सांगितले की, १७ मार्च रोजी फ्लोर टेस्टसाठी तयार रहा अन्यथा आपल्याजवळ प्रत्यक्षात राज्य विधानसभेत बहुमत नाही, असे मानले जाईल.

विधानसभा २६ मार्चपर्यंत तहकूब
मध्य प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही वेळात कोरोना विषाणूचा हवाला देत सभागृह २६ मार्चपर्यंत तहकूब केले. यावर भाजपच्या आमदारांनी गोंधळ केला आणि सांगितले की सरकार फ्लोर टेस्टला घाबरत आहे. त्यांनतर विधानसभेची कार्यवाही सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन काही काळानंतर निघून गेले. ते म्हणाले, “प्रत्येकाने राज्यघटनेतील नियमांचे पालन केले पाहिजे जेणेकरून मध्य प्रदेशची प्रतिष्ठा टिकून राहील.”

भाजप सर्वोच्च न्यायालयात पोहोचले
आज मध्य प्रदेश विधानसभेत फ्लोर टेस्ट न झाल्याने संतप्त झालेल्या भाजपाने सर्वोच्च न्यायालयात संपर्क साधला आहे. याप्रकरणी 48 तासांत सुनावणी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

कमलनाथ यांचे राज्यपालांना पत्र :
सीएम कमलनाथ यांनी राज्यपालांना पत्र लिहून फ्लोर टेस्ट थांबवावी, अशी मागणी केली. ते म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत फ्लोर टेस्ट घेणे लोकशाहीच्या विरुद्ध असेल. कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या अनेक आमदारांना भाजपने अटक केल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ हे सातत्याने सांगत आहेत की, ते फ्लोअर टेस्टसाठी तयार आहेत, परंतु बंगळुरूमध्ये त्यांचे आमदार मुक्त करेपर्यंत फ्लोर टेस्ट घेतली जाऊ शकत नाही. सोमवारीही त्यांनी याचा पुनरुच्चार केला आहे.