राष्ट्रवादी काँग्रेससह ‘हा’ मोठा पक्ष गमावणार ‘राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर आपल्या पक्षाचा असणारा राष्ट्रीय दर्जा गमावण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जर आयोगाने त्यांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला तर तो पुन्हा मिळवणे अवघड जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत सात पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. त्यात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांचा यात समावेश आहे.

निवडणूक आयोच्या नियमानुसार ज्या पक्षांना चार राज्यात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत सहा किंवा त्यापेक्षा जास्त मते पडतात, त्याच पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा दिला जातो. त्याचप्रमाणे या पक्षांना तीन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांतून खासदार निवडून आणतानाच चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा देखील मिळवावा लागतो. २०१६ मध्ये बदललेल्या निर्णयानुसार आता ५ वर्षांऐवजी त्या पक्षाच्या १० वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आपला राष्ट्रीय दर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.

दरम्यान, या निर्णयावर भाष्य करताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी म्हणाले कि, पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला, तरीही पक्षाचे संघटनात्मक काम सुरूच राहील. त्यामुळे या गोष्टीचा पक्षावर फारसा परिणाम होणार नाही.