नायलाॅन मांजामुळे पक्षांचा जीव टांगणीला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नायलाॅन मांजामुळे अनेक अपघात घडले आहेत. यामुळे अनेक माणसांच्या जीवावर बेतले आहे तर अनेकजण यामुळे जखमीही झाले आहेत. माणसांसोबतच हा नायलाॅन मांजा पक्षांसाठीही धोकादायक ठरताना दिसत आहे. अशा या धोकादायक नायलाॅन मांजावर बंदी लादली गेली आहे. असे असले तरी देखील संक्रांतीपासून याचा वापर सर्रास होताना दिसत आहे. पाखरांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वजण एकमेकांना तिळगुळ वाटप करतात. सर्व जुने भांडण विसरून अनेकजण नव्याने नात्यात गोडवा निर्माण करतात. वर्षाच्या सुरुवातीलाच हा सण आल्याने वर्षभर नात्यात गोडवा टिकून राहावा म्हणून हा सण साजरा करतात. याच सणाच्या निमित्ताने सर्वत्र पतंग उडवण्याचा आनंद लुटला जातो. बंदी असणाऱ्या नायलाॅन मांजाचाही यात सर्वत्र वापर होताना दिसताे. यामुळे अनेक पक्षी जायबंदी होऊ लागले आहेत. शिवाय अशा घटना संक्रांतीपासून वाढताना दिसत आहेत. अनेकदा पतंग झाडाला अडकतो त्यासोबतच त्याचा मांजाही तुटून तेथेच अडकतो आणि हा अडकलेला मांजा म्हणजेच पक्षांसाठी सापळा ठरताना दिसत आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या आठवडाभरात सुमारे २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले आहेत. पक्षांचा जीव वाचवण्यासाठी अनेक नाशिक शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक पक्षीमित्र उपलब्ध आहेत. पक्षी जायबंदी झाल्याच्या घटनेचा काॅल आल्यानंतर त्यांनी या काॅलला दाद देत विविध ठिकाणी धाव घेत अनके पक्षांचे प्राण वाचवले. तब्बल २८ ते ३० पक्ष्यांचा जीव वाचविण्यास त्यांना यश आले आहे. पक्षीमित्रांव्यतिरीक्त महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी हायड्रोलिक शिडीच्या सहाय्याने काही पक्षांची सुटका केली आहे. नायलाॅन मांजा हा कुजत नाही त्यामुळे झाडाला अनेक ठिकाणी अडकलेला हा मांजा तसाच कायम राहतो. या मांजामुळे पक्षी जायंबदी होण्याच्या अनेक घटना वर्षभरही सुरुच राहतील अशी भीती पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे. नायलाॅन मांजाच्या सर्रास होणाऱ्या वापराबाबत काही अॅक्शन घेतली जाणे आवश्यक आहे असे मत व्यक्त करण्यात येत आहे.